आनन

कांती नितळ, विशाल भाळ,
कुंतल ओघळ, सुंदरसे

भुवया कमानी, गाली तकाकी
हनुवटी तीळ, विलसतसे

मोहक नेत्र, अर्धोन्मिलीत
मार्दव त्यात, ओथंबूनसे

आनन कमल, तेज विपुल
ओठ मृदुल, खुलवितसे

Advertisements

ग्रँड कॅन्यन – १

२०१३ च्या लेबर डे वीकेंडला लागून सुट्टी टाकली होती. मी, मानसी, ओज, अमित आणि निधी असे पाच जण वेस्ट कोस्टच्या १० दिवसांच्या ट्रिपला निघालो. ग्रँड कॅन्यनची साऊथ रिम आणि नॉर्थ रिम या दोनही ठिकाणी जायचा बेत होता. आम्ही पहिले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरून शेवटी साऊथ रिमला पोहोचलो. दुपार ते संध्याकाळच्या वेळात साऊथ रिमवर भटकलो. नैसर्गिक व्यवधानं बाळगणं हा निसर्गाचा स्थायी भाव. आपल्या उपजत कलेस प्रामाणिक राहून त्याने केलेलं कोरीव काम म्हणजे कसलेल्या कलाकाराची अदाकारीच. हे कोरीव काम प्रत्यक्षात होताना एकदा पाहायला मिळावं ही एक कधीच पूर्ण न होणारी ईच्छा मनाशी बाळगून तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी जवळ-जवळ अर्धा दिवस गाडी चालवत आम्ही नॉर्थ रिमला पोहोचलो. साऊथ ते नॉर्थ प्रवाससुद्धा अविस्मरणीय आहे. मैलोनमैल पसरलेली लाल माती आणि लाल डोंगर. परत एकदा निसर्गाने ‘मी अस्साच आहे’ असं ठासून सांगितलं आहे. खुरटी झुडपं सोडली तर अगदी नावाला काही झाडं आणि बाकी सारं उजाड माळरान. एका मोठ्ठ्या सेपिया टोनमधून आपण जात आहोत असं वाटत राहतं. तो प्रवास आम्ही अगदी मनापासून एन्जॉय केला. नॉर्थ रिमला पोहोचल्यावर लगेचच आम्ही कड्यावर जाऊन दरी पाहायला गेलो. सूर्यास्त होत आला होता. अनेक कॅमेरे ट्रायपॉडवर लागले होते. तिन्हीसांजेचा अंमल चढू लागला होता. ‘प्रकाश’ या एकाच एककावर संपूर्ण नाट्य घडवून आणण्यात येत होतं. माझ्या फोनच्या साध्या कॅमेऱ्यातून काढलेले फोटोसुद्धा अप्रतिम आले आहेत. प्रकाशाचे कोन, कोरलेले उभे कडे, कड्यांवरच्या रेषा आणि त्या रेषारेषांतून डोकावणारा कलाकार. महाकाय पार्श्वभूमी आणि त्यावर बारकाईने केलेलं काम या दोन्हीस न्याय देत रविराज विश्रांतीस जात होते. काही दृष्य इतकी मोहक होती की प्रकाशाने कूस बदलूच नये असं वाटत होतं. जितकं सामावून घेता येईल तितकं आम्ही घेतलं आणि हॉटेलवर परतलो.

नॉर्थ रिमवरून दरी पाहताना काही पायवाटा खाली जाताना दिसल्या. राजू, आमचा मित्र, म्हणायचा एकदा तांबडी माती पायाला लागली की ती निघणं अशक्य असतं. तोच तो क्षण होता, त्याच वेळी परत यायचा निश्चय केला होता. सह्याद्रीतली असो वा ग्रँड कॅन्यनची. माती ती मातीच. लाल ती लालच.

२०१६ मध्ये परत मनावर घेतलं की ग्रँड कॅन्यनचा ट्रेक करायलाच पाहिजे. ४/५ जणांची टीम जमवली होती. पण त्यातले एक-एक करत गळत गेले. त्यातच २०१७ चं महाराष्ट्र मंडळाचं काम हातात घेतलं होतं. त्यामुळे बेत २०१८ वर ढकलला गेला. ३०.सप्टेंबर.२०१७ रोजी मंडळाचा नवरात्रीचा कार्यक्रम होता. तो छान पार पडला. आणि घरी येतानाच आठवण झाली की उद्या १ तारीख आहे. ग्रँड कॅन्यनमध्ये खाली एकच रांच हाऊस आहे. त्यात स्त्रियांची आणि पुरुषांची राहायची व्यवस्था वेगळी आहे. एका वेळेस फक्त २० स्त्रिया आणि २० पुरुष रात्री राहू शकतात. साहजिकच या ठिकाणाचं आरक्षण मिळवायला महत्प्रयास करावे लागतात. इथे राहाण्याची जमेची बाजू म्हणजे राहणाऱ्या सर्वांना रात्रीचं जेवण, सकाळची न्याहारी आणि दुपारचं जेवण मिळतं. अन्यथा कॅम्पिंगची सोय आहेच. पण कॅम्पिंग म्हणजे शिधा आणि गॅस सगळंच बरोबर न्यावं लागतं. ते सुद्धा तिथे विकत घ्या आणि नंतर कारायचं काय त्या गोष्टींचं हा प्रश्न आहेच.

२०१७ च्या शेवटापर्यंत त्या रांच हाऊसचं आरक्षण फोनवर होत असे. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला पुढल्या १३ महिन्याचं आरक्षण खुले होत असे. म्हणजे तसं म्हटलं तर १३ व्या महिन्याचच खुलं होत असे. जॉर्जियातल्या ९.०० वाजता म्हणजे तिथल्या ७.०० वाजता फोन लाईन्स सुरु होत असत. आतापर्यंत आम्ही ४ पुरुष आणि १ स्त्री असे पाच जण अशी नवी टीम तयार झालो होतो. ०१.ऑक्टोबर.२०१७ रोजी आम्ही, चौघे पुरुष, वॉट्सअॅप वेबवर ०८.३० पासून संपर्कात होतो. प्रत्येकाने फोन लावायचा आणि आरक्षण मिळवायचा प्रयत्न करायचा असं ठरलं होतं. ०८.५० पासून आम्ही फोन लावायला सुरुवात केली. मी आजतागायत इतक्या वेळा एंगेज टोन ऐकला नसेल तितक्या वेळा तो त्या दिवशी ऐकला. त्यावर कडी म्हणजे एंगेज टोन येऊनसुद्धा चिकाटीने तोच फोन नंबर लावत राहिलो. आम्ही चौघेही हेच करत होता. सरते शेवटी ०९.३२ ला माझा फोन लागला आणि मंजुळ आवाजात तिथली कर्मचारी माझ्याशी बोलू लागली. माझ्या १७८व्या प्रयत्नाला माझा फोन लागला. मला जितकी घाई होती तितक्याच शांतपणे ती मला प्रश्न विचारात होती आणि आम्हाला मनाजोगतं आरक्षण तिने करून दिलं. १२.ऑक्टोबर.२०१८ रोजी आम्ही पाच जण नॉर्थ रिम वरून पहाटे ०५.०० वाजता खाली दरीत उतरायला लागू. १२.ऑक्टोबर.२०१८ च्या रात्री आम्ही त्या रांच हाऊसमध्ये राहू. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साऊथ रिम वर चढत येऊ. असा आमचा २१ मैलांचा पायी प्रवास असेल. या करता लागणारा सव्यापसव्य आम्ही आधीच करून ठेवू. म्हणजे साऊथ रिमला वर आल्यावर तिथे गाडी पाहिजे. म्हणजेच नॉर्थ रिमला जायच्या आधी साऊथला येऊन गाडी पार्क करायची आणि बसने नॉर्थ रिमला जायचं ई.

ग्रँड कॅन्यनमधल्या २१ मैलांच्या अनुभवासाठी आम्ही तयारी सुरु केली आहे. सॅक, कॅमल सॅक, बूट, कपडे, हायकिंग पोल्स ई. गोष्टींची तयारी झालीच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती आणि शरीराला असायला पाहिजे ती सवय. याच्या जोडीला ट्रेक करताना अत्यावश्यक गोष्ट म्हणजे शांत चित्त. याकरता स्वतःला आव्हान देत निसर्गरम्य जॉर्जियातल्या वेगवेगळ्या डोंगर रांगांतून फिरणं सुरु आहेच.

पुढील भाग आम्ही तिथे जाऊन आल्यावर !

एकादशी

बुद्धिबळाच्या पटावर खेळतो आम्ही सारीपाट
आमच्याच चुकांना म्हणतो आम्ही वहिवाट
तुझ्या असण्याचा असतो आमचा अट्टाहास
तुझा आधार लागतो आमच्या मनगटास

म्हणे हजारोंनी होत जातील गोळा
साजरा कराया तुझ्या भक्तीचा सोहळा
तू असशी कल्पना अमर्याद विरक्त
साधनालाच साध्य मानून चाले तुझा भक्त

काहिली

ग्रीष्म. वैशाख. नुसती काहिली होत होती शरीराची. ध्यानीमनी नसताना ती अचानकपणे दिसली. कसलाही विधिनिषेध न बाळगता, कुणालाही न विचारता, अगदी तिलाही, सरळ तिला घेऊन घरी निघालो. आता काहिली मनाचीही होत होती. आम्ही घरी पोचलो. आत आलो. तिचं अंगं जरा कोमट लागत होतं. कदाचित उन्हाळ्यामुळे किंवा कशामुळे. पण मी तिला दार उघडून दिलं आणि थंड हवेचा झोत अंगावर आला. तिला आत बसवलं. दार लावलं आणि मी पटकन शॉवर घ्यायला गेलो. थंड पाण्याने आंघोळ करताच तरतरी आली. खिम्याचे पॅटीस होतेच, ते फ्रीजमधून काढले आणि तळायला घेतले. तळून झाले आणि प्लेटमध्ये खायला घेतले. तितक्यात आपण तिला कसे विसरलो याची मनोमन लाज वाटली. प्लेट खाली ठेवली. हळूच दार उघडलं आणि आत पाहिलं तर ती तिथेच होती. तिच्या कमनीय बांध्याची तिला नक्कीच कल्पना नव्हती. आणि तिची सोनेरी सळसळती कांती त्या थंड हवेत अधिकच आकर्षक दिसत होती. मला राहावलं नाही मी एका झटक्यात तिला जवळ घेतलं आणि माझे ओठ तिच्यावर टेकवले. एक थंड लहर माझ्या रोमारोमांतून विजेच्या वेगाने पसरली. मूर्त रूपाने आम्ही एक होत गेलो आणि आता आम्हाला कुणीही वेगळं करू शकणार नव्हतं. हळूहळू मी अनुभूती साठवून घेऊन लागलो. तशीच हळूहळू गात्रं शांत होत गेली. शरीराची आणि मनाची काहिली थांबली होती. पण ते क्षण काही अनंतकाळ टिकणारे नव्हते. आणि ती गेलीच. कायमचीच.

मी न हिरमुसता उठलो. दार उघडलं आणि तोच थंड हवेचा झोत अंगावर आला. आणि बायको यायच्या आत मी अजून एक बीअर प्यायचा निश्चय केला.

चिअर्स !!

मराठी

मी मराठी, माय मराठी

चैतन्य मराठी, नाविन्य मराठी

साज मराठी, माज मराठी

वाद मराठी, संवाद मराठी

बाणा मराठी, कणा मराठी

समशेर मराठी, लेखणी मराठी

स्वराज्य मराठी, सुराज्य मराठी

अंगण, प्रांगण, रणांगण, नभांगण मराठी

मी मराठी, माय मराठी

महाराष्ट्र मंडळ अॅटलांटा २०१७, अध्यक्षीय मनोगत

२०१५ च्या गणपतीत मंडळाला एक छान एकांकिका बसवून द्यायचा विचार मनात घोळू लागला. आणि त्या एका गोष्टीवरून हे सगळं रामायण घडत गेलं. आई, सासूबाई, सासरेबुवा सगळे येणारच होते. माझे सासरे गेली ४२ वर्षं कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून रंगभूमीवर कार्यरत आहेत. झालं ! त्यानं म्हणालो २/४ स्क्रिप्ट घेऊन या आणि विनोदीच पाहिजेत कारण गणपतीतला सर्वसाधारण मूड बघता विनोदीच मस्त जमेल. निवडलेल्या एकांकिकेत एकून १२ प्रौढ पात्रं होती. साहजिकच, १२ कुटुंब एकत्र आली. आणि तिथून आम्ही एक मोठ्ठा चमू झालो. एकांकिकेच्या तालमी आणि तयारी होत होती. या मागचा विचार एकच होता, स्थानिक लोकांतूनच एकेक जण तयार करून समाजाचं ऋण फेडायचं. सगळ्या पाट्या कोऱ्याच पाहिजे होत्या, म्हणजे जर नाटकात कधीच काम केलं नसेल तरच त्याची/तिची निवड करायची असं पक्कं ठरवलं होतं. झालंही तसंच, अपवाद एखादाच. तर मंडळी, एकांकिका झाली, गणपती गेले. आणि नंतर एक मोठ्ठी पोकळी निर्माण झाली. म्हणजे आम्ही १२ कुटुंब भेटत राहिलो पण आम्हाला हवा तसा रंगमंच मिळेना. नुसतीच घालमेल आणि तगमग.

जवळ-जवळ एक वर्षं होत आलं. मला १२ पैकी एकालाही/एकीलाही मागे ठेवून काहीही करायचं नव्हतं. आणि इतकी मोठी, सशक्त आणि प्रत्येक पात्राचं योगदान दिसून येईल अशी संहिता दिसत नव्हती. आणि तेव्हाच, मंडळाच्या एका विश्वस्तांकडून समिती स्थापन करण्याचं सुचविण्यात आलं. आणि मला ती संहिता दिसू लागली. मी मित्र-मंडळींसमोर समिती स्थापन करायचा प्रस्ताव ठेवला. सर्वांनी तो उचलून धरला आणि आमच्यातच झटपट निवडणूक घेऊन कोण काय करणार ते ठरवलं. मंडळाला प्रस्ताव पाठवला आणि २०१६च्या गणपतीपासूनच कामाला लागलो. जे शिकायला मिळेल ते पदरी पाडून घ्यायचं होतं कारण तेच – कोऱ्या पाट्या, नवे भिडू, नवे राज्य, विशाल मंच !!

आमची समिती वेगळी आहे किंवा आम्ही यंव करू त्यंव करू अशी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आम्हाला मान्यच नव्हतं. म्हणजे असं बघा की, कार्यक्रम तेच, कमीत कमी पाच तरी करायचे. जेवण तर द्यायलाच पाहिजे, म्हणजे आपल्या संस्कृतीचा तो अविभाज्य आणि मुख्य घटक आहे. मग आपण वेगळेपण आणायचं तरी कशात? की तेच पहिले पाढे पंचावन्न? हा सर्व उहापोह सुरु असताना एकेक समिती सभासदांनी सुरेख कल्पना पुढे आणल्या. आणि आम्ही त्या उचलून धरल्या. संक्रांतीचं वाण एक प्रचंड यशस्वी योजना होती. समाजातील शारीरिक आणि आर्थिक सक्षम वर्गाने या दोन बाबतीत आव्हान असणाऱ्या वर्गाला नुसतंच दान न देता त्यांच्या कामाचा मोबदला द्यायचा. काय अफलातून कल्पना आहे !! सहानुभूती, उपकार यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन सक्षमीकरणासाठी करावी लागते ती मदत आम्ही केली. आणि हो, याचं पूर्ण श्रेय आम्ही अॅटलांटाच्या मराठी जनतेला देऊ ईच्छितो. केवळ तुमच्यामुळे हे शक्य झालं आहे. मंडळ फक्त माध्यम आहे. आजही हेलन केलरच्या मुलांनी बनवलेला तो अॅप्रन घालताना छाती अभिमानाने फुलून येते.

दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला काही थीम-बीम ठेवायची नव्हती. म्हणजे थीमच्या चौकटीत अडकून कार्यक्षमतेवर आणि नाविन्य आणण्यावर बंधन घालायचं नव्हतं. म्हणून साधं-सोपं ब्रीदवाक्य घेतलं – मी मराठी, माय मराठी. मंडळाच्या यंत्रणेतल्या जंजाळातला मूलभूत समान धागा – मराठी धागा ! हो, आणखी एक गोष्ट पक्की केली होती, ती म्हणजे ‘लोकांचा सहभाग’. स्थानिकांकडूनच कार्यक्रम करून घ्यायचे असं पक्कं ठरवलं होतं आणि त्यात १००% पारदर्शकता आणायची. कारण त्यातूनच समाजाचा मंडळाच्या यंत्रणेवरचा विश्वास वाढीस लागतो. संक्रांतीचा संमोहनाचा कार्यक्रम – लोकांनी पुढे येऊन संमोहित करून घेतलं. पाडव्याचा ‘आम्हा घरी धन’ – युवा आणि तरुण वर्गाकडून उदंड प्रतिसाद. गणेशोत्सव – पुनश्च लोकांनीच सादर केलेले कार्यक्रम. नवरात्र आणि दीपावली – अगदी सगळे कार्यक्रम १००% लोकांच्या सहभागाने सादर केले. याचं एकच कारण आहे, अॅटलांटा, तुमच्यात ती धमक आहे, स्वतःवरचा विश्वास आहे, उत्साह आहे आणि हौस आहे. आणि म्हणतात ना “हौसेला मोल नसतं” – ते मी २०१७ मध्ये पुरेपूर अनुभवलं आहे.

समितीसाठी काम करताना मला अनेक मराठी म्हणींचा प्रत्यय आला. नाचता येईना अंगण वाकडे, व्यक्ती तितक्या प्रकृती, तू शिवाजी मी तानाजी, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, नाकापेक्षा मोती जड, दगडापेक्षा वीट मऊ, दुष्काळात तेरावा महिना, दुसऱ्या वरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, दे माय धरणी ठाय, असून अडचण नसून खोळंबा, आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी, आलीया भोगासी असावे सादर, आळश्याला दुप्पट काम ई. ई. सरते शेवटी एक म्हण नेहमीच पाठराखण करत असते – ऐकावे जनाचे करावे मनाचे !! असो. पण असं असलं तरीही हे अनुभव जगणं, त्यातून जाणं हे खूप काही शिकवून गेलं. ते गाठीशी पक्कं बांधून ठेवलं आहे.

एकूणच २०१७ समितीत काम करणं एक आनंददायी अनुभव होता किंबहुना सोहळाच होता म्हणा ना. रंगीबेरंगी दिमाखदार सोहळा, मनाचं पारणं फेडणारा सोहळा !!

मी पुनःपुन्हा तेच सांगेन, तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत म्हणून तुमचे मनापासून आभार !!

— महाराष्ट्र मंडळ अॅटलांटा वार्षिक गुजगोष्टी २०१७ मध्ये प्रकाशित

भीमाशंकर – सुसह्य अद्री १

आम्हाला डोंगर-दऱ्यांच्या नादी काका आणि राजूनं लावलं. काका म्हणजे आमचा मित्रच, टोपण नाव मात्र काका. लोहगड-विसापूरला श्रीगणेशा झाल्यानंतर पुढला धडा शिकण्यासाठी भीमाशंकरची निवड झाली होती. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, भीमाशांकर. नाक्यावर प्रस्ताव मांडला गेला आणि काका, राजू, म्हशा आणि मी असे चौघे निघालो. ऐन पावसाळ्यात भीमाशंकर करायचा म्हणजे पर्वणीच !! नेहमीप्रमाणे खिचे रिकामेच होते. भांडवल होतं ते फक्त अंगातल्या खुमखुमीचं. सॅका भरल्या आणि निघालो. डोंगरमाथ्यावर थेट एस.टी. पोहोचत असल्यामुळे जेवणा-खाण्याची व्यवस्थित सोय असते म्हणून खाण्याचं सामान तसं कमीच होतं. स्टोव्ह आणि रॉकेलही घेतलं नाही. आणि त्यात पाऊस म्हणजे कुठे चूलही पेटवता येणार नव्हतीच. कपडे, अंगावर घ्यायला चादर आणि जुजबी सामान घेतलं होतं. शनिवार, १०.जुलै.१९९९ रोजी सकाळी निघालो. साधारण दहाच्या सुमारास स्टेशनला पोहोचलो. ठाणे स्टेशन. नाईलाजास्तव तिकीटं काढली आणि कर्जत गाडीची वाट पाहात थांबलो होतो. ट्रेन आली. शनिवार असल्यामुळे तशी गर्दी कमी होती. सॅका सामान ठेवतात तिथे वर कोंबल्या आणि दारात वारा खात उभे राहिलो. थोड्यावेळाने आत येऊन बसलो. या कर्जत/कसारा गाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ठाणं सोडलं की त्या बायका, नऊवारी लुगडं नेसलेल्या, पाट्या घेऊन रानमेवा किंवा वेगवेगळी फळं विकायला येत असत. करवंद, जांभळं, बोरं, पेरू, चिकू, संत्री वगैरे. जांभळं घेतली आणि आमची ट्रेन जांभळाच्या बियांची ट्रॅकच्या दुतर्फा पेरणी करत पुढे धावू लागली.

कर्जतला उतरलो आणि एस. टी. स्टॅण्डच्या दिशेने चालू लागलो. एक तासाने एस. टी. निघणार होती. तिथेच काहीतरी खाऊन घेतलं आणि एस. टी. ची वाट पाहात बसलो. एस. टी. आली. बसलो. साधारण एक तासावर खांडसला उतरलो. खांडस म्हणजे पायथ्याचं गाव. गावाच्या पश्चिमेला नेरळ-माथेरानची डोंगर रांग तीच खाली दक्षिणेला येत खोपोली, खंडाळा, लोणावळा करत वर जाते. उत्तरेला दूरवर कसारा, इगतपुरी आणि घोटी. तीन बाजूंनी वेढा पडलेल्या क्षेत्रातलं गाव. गारद झालेलं गाव. सह्याद्रीच्या पश्चिमी घाटाला मोठ्या अभिमानानं ईमान वाहून नतमस्तक झालेलं, खांडस !!

दुपारचे चार वाजत आले होते. चढाई करायला सुरुवात करायची होती. म्हणजे उजेड असेपर्यंत महत्त्वाचे टप्पे पार करून, एकूण चार तासांत, वर पोहोचलो असतो. चालायला सुरुवात केली. हळू हळू चढणीला सुरुवात झाली. एक अर्ध्या तासाने आम्हाला झाडाच्या एका फांदीवरून किंग कोब्रा जाताना दिसला. आम्ही स्तब्ध उभे राहून, भयचकित नजरेने, त्याला पाहत होतो. आपलं लवचिक शरीर वापरून अगदी सहज-सुंदर वळणं घेत तो ऐटीत निघून गेला. आम्ही तिथेच सिगरेटी शिलगावल्या आणि दहा मिनिटं गप्पा-टप्पा झाल्या. वेळेचं भान राखून लगेच पुढे निघालो. माथ्यावर पोहोचण्यासाठी इथे दोन मळलेल्या वाटा आहेत. “गणेश घाट” किंवा “गणपती घाट”. या वाटेवर रस्त्यात गणपतीचं देऊळ लागतं. ही वाट थोडी वळसा घालून जाते आणि जोखीम मात्र कमी आहे. दुसरी वाट म्हणजे “शिडीची वाट” किंवा “शिडी घाट”. शिडीची वाट वेळ थोडा कमी घेते आणि जोखीम जSSSSरा जास्त आहे. अर्थातच आम्ही शिडीने जाणार होतो. आणि झपाझप पाय उचलत होतो. मला आठवत आहे त्याप्रमाणे या वाटेवर तीन ठिकाणी कातळात शिड्या बसवल्या आहेत. म्हणजे शिड्या नसतील तरीही जाता येईल पण शिड्यांमुळे ते तीन भाग सहज पार करता येतात. आम्ही शिड्यांपाशी येऊन पोहोचलो होतो. तेव्हा आजच्या सारखे कॅमेरे असलेले फोन हातात नव्हते किंबहुना मोबाईल फोन तीन/चार वर्षांपूर्वीच आले होते. माझ्याकडे कॅमेरा होता पण रोलचा नेहमीचा ३६चा आकडा ! त्यामुळे वाट्टेल तसे फोटो काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे सर्वानुमते ठरल्यावरच फोटो काढला जायचा. तशात अंधार होत होता म्हणून फोटो काढायचा नाही असं ठरलं आणि शिड्या पार करून पुढे निघालो.

वाटेत दोन खूप छान आणि आव्हानात्मक प्रकार आहेत. पहिला म्हणजे डोंगर कपारीला लागून असलेल्या पायवाटेने जाताना एक मोठ्ठा खडक बाहेर आला आहे. त्याला वळसा घालून पुढे जावं लागतं. मात्र वळसा घालताना त्या खडकाला मिठीच मारावी लागते कारण जेमतेम पाय टेकेल इतकीच जागा मिळते. पायांत बूट असल्यामुळे त्या जागेत पाय टेकवणं म्हणजे महत्प्रयासाचं काम होतं. मनाचा हिय्या करून आम्ही एक-एक करून पुढे सरसावलो. मागच्याने पुढच्याला आणि पुढच्याने मागच्याला तुझं काय बरोबर काय चुकतंय हे सांगत-सांगत आम्ही सगळे त्या खडकाला वळसा घालून पुढे आलो. कळत्या वयातली, जीवाच्या आकांतानी मारलेली, आपली पहिली मिठी एका खडकाला असावी म्हणून मी आणि म्हशा थोडे चुकचुकलो. या धक्क्यातून सावरण्यासाठी (म्हणजे उगाचच) सिगारेटी शिलगावल्या आणि धुक्यात धूर सोडू लागलो. राजू म्हणाला चला पुढे, अंधार होतो आहे आणि दुसरा प्रकार पार करायचा आहे, “ट्रॅव्हर्स”. कपारीतली पायवाट एके ठिकाणी चक्क नाहीशी होते. उजवीकडे वर सरळसोट कातळ दिसतो. पुढे-खाली आणि डावीकडे-खाली खोल खोल दरी. म्हणजे त्यात पडलो तर कदाचित मरणार नाही पण २०६ पैकी किमान १०० हाडं तरी मोडतीलच आणि कायमचे अपंग व्हायची शक्यता नाकारता येत नाही. इथून पुढे जायला एकच मार्ग आहे तो म्हणजे उजवीकडच्या कातळावर असलेल्या खाचांमध्ये बोटं घट्ट रोवायची, अगदी घोरपडीसारखी. दोन्ही हातांच्या बोटांनी खाचांमधून व्यवस्थित पकडी घेतल्या की चेहरा आपसूकच कातळाच्या दिशेला येतो. पाय जमिनीवरून सोडून द्यायचे. आणि चक्क लटकायचं आणि ट्रॅव्हर्स मारायचा. त्यात पाठीवरची सॅक गुरुत्वाकर्षणाच्या नियमांवरची तिची निष्ठा दाखवत होती. फार नाही पण हाताच्या एक-दोन अदला-बदलीत ट्रॅव्हर्स पार होतो. आणि पाय पुन्हा जमिनीला लागतात. त्या सह्याद्रीच्या कुशीतच पाय जमिनीवर असणं किती गरजेचं आहे याचे धडे आम्ही गिरवले आणि पुढे निघालो. इथून पुढे जास्त-जास्त अंधार होत गेला आणि पावसाला सुरुवात झाली. आम्ही बॅटऱ्या काढल्या आणि गरज पडेल तश्या पेटवत गेलो. नागमोडी वळणं घेत-घेत पायवाट आणि आम्ही वर-वर जाऊ लागलो. एव्हाना धुवांधार पाऊस लागला होता आणि आम्ही पूर्णपणे भिजलो होतो. सॅक, बूट मोजेसुद्धा ओले झाले होते.

राजू पुढे होता, त्याच्या मागे मी, काका आणि म्हशा. एका वळणावर मी एकदम आश्चर्यचकित होऊन ओरडलो, “अरे, हे बघ काय !”. सगळे थांबलो आणि मी बोट दाखवत होतो त्या दिशेने पाहू लागलो. आम्ही आमच्यापासून अगदी पाच फुटांवर असलेल्या झाडांच्या मुळांकडे बघत होतो. डोंगर-उतारावरची झाडं असल्यामुळे त्या झाडांची एका बाजूची मुळं पूर्णपणे जमिनीत आणि एका बाजूची उघडी पडली होती. ती उघडी पडलेली मुळं साधी-सुधी वाटत नव्हती. ती चमकत होती. त्यांच्यावर तेज होतं. कुट्ट अंधारात दिसावी म्हणून निसर्गाने स्वयंप्रकाशित नक्षी काढली होती. काका म्हणाला, “ज्योतवंती ! ज्योतवंती आहे ही !!” अशा उघड्या पडलेल्या मुळांवर एक प्रकारची बुरशी वाढते. ही बुरशी अंधारात चमकते आणि मुळांच्या आकाराची नक्षी उठून दिसते. ईंग्रजी शास्त्रीय परिभाषेत त्याला “Bioluminescent Fungi” म्हणतात. ती सुरेख नक्षी न्याहाळत आम्ही पाच मिनिटं तिथेच थांबलो.

आठ वाजले होते. आणि साधारण एक तासात आम्ही वर पोहोचणार होतो. बरोब्बर नऊ वाजता आम्ही डोंगमाथ्यावर पोहोचलो होतो. देवळाच्या दिशेने चालत होतो. देवळाच्या परिसरात एक तरुण भटजी दिसला. जेवणाची आणि राहण्याची चौकशी केली तर ते नेमके तिथल्या पौरोहित्य करणाऱ्या मोठ्ठ्या कुटुंबातले निघाले. त्यांच्याकडे जेवणाची आणि राहण्याची सोय होती. आम्ही हात पाय धुतले. सुके कपडे घातले आणि त्यांच्या जेवणाच्या खोलीत जेवायला बसलो. गरमा-गरम पिठलं, भाकरी, वरण-भात असा शाही खाना हादडला. हात धुवून बाहेरच्या खोलीत आलो. खोली नव्हे, एक बऱ्यापैकी मोठी जागा होती. तिथे बरीच मंडळी झोपायला होती. आम्हाला भेटलेले तरुण गुरुजी म्हणाले तुम्हाला झोपायला पट्ट्या देतो. आम्हाला पट्ट्या म्हणजे काय ते काही कळेना. तितक्यात त्यांनी किंतानाचे तुकडे आणले. प्रत्येकास एक तुकडा मिळाला. किंतानाच्या त्या पट्ट्या कापताना एकावेळेस एक माणूस पूर्णपणे मावू शकणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. आम्ही डोक्याखाली सॅका घेतल्या आणि पाय कसेबसे किंतानाच्या आत मावतील असे झोपलो. झोपायच्या आधी त्याच तरुण गुरुजींकडून देवळातला उद्याचा अभिषेक करून घ्यायचं नक्की केलं. आता अंग मस्त दुखत होतं पण ते मेंदूपर्यंत पोहोचवण्यात ग्लानी आड येत होती. हळूहळू पंचेंद्रियातलं एकेक शांत होत गेलं. आणि सुखाची झोप लागली. मध्यरात्री कसल्यातरी आवाजाने जाग आली. नंतर कळलं की थोडं पलीकडे झोपलेला एक जण मनसोक्त घोरत होता. हे जे घोरणं असतं त्यात पण एक लय असते. काहींची आवर्तनं छोटी असतात, काहींची लांब-लचक. परत झोप लागायला पाच मिनिटं गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास जाग आली. आन्हिकं उरकली आणि देवळाच्या दिशेने निघालो. तरुण गुरुजी आधीच तिथे रवाना झाले होते. अभिषेक झाल्यावर नागफणी आणि मग खाली उतरायचं असं ठरलं होतं. पण नागफणी झालं नाही. आम्ही शिडीच्या वाटेने खाली उतरणार होतो, ते ही झालं नाही. आम्ही नक्की कोणती वाट घेतली आणि का? त्या वाटेवर काय काय घडलं? रात्री घोरणारा आणि त्याचा मित्र अशी ती उल्हासनगरची दोन सिंधी मुलं आमच्यात कधी आणि कशी सामील झाली? आम्ही सहा जणांनी किती पायपीट केली आणि किती वाजता डांबरी रस्त्यावर आलो? हे सगळं पुढल्या आणि शेवटच्या भागात.